धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकामुळेच ‘कोरोना’ नियंत्रणात, भाजप नेत्याकडून फोटो शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यात यश आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. त्यानंतर धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. महापालीका प्रशासन, राज्य सरकार आणि आरएसएस यांच्यात श्रेयवादावरून कलगितुरा जुंपल्याचं बघायला मिळत आहे. या श्रेय वादावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमुळेच धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याचे म्हटले आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं धारावीतील कोरोना नियंत्रणाचे कौतुक केलं आहे. WHO चं कौतुक म्हणजे कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देणारे आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 22152 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण या संकट काळात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आलं आहे. मात्र, यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह माहिती देताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 800 स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच RSS स्वयंसेवकांनी लक्षणीय काम केलं असून धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणं, अन्नधान्य पुरवणं, यासारखी महत्त्वाची कामे केली आहेत. या कामादरम्यान काहींना कोरोनाची लागण झाल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केलं आहे.

यापूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनीही हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचे मत व्यक्त केलं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागात दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थावर अन्याय करण्यासारखे आहे, असे राणे यांनी म्हटले होते. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचे म्हटले होते. मात्र, यावर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपवर टीका करत प्रत्युत्तर दिलंय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like