WHO च्या ‘धारावी मॉडेल’ कौतुकावरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु !

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण, या संकटात आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आले आहे. मात्र, धारावीच्या कौतुकानंतर तेथील श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमुळे धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असे म्हटले आहे.

धारावीतील कोरोना नियंत्रणाचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. WHO चे हे कौतुक म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देणारे आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतकी झाला आहे. त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांचा मृत्यू झाला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह माहिती देताना, राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या 800 स्वयंसेवकांच्या कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आला आहे. तसेच, RSS स्वयंसेवकांनी लक्षणीय काम केले आहे. धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणे, अन्नधान्य पुरवणे यासह अनेक महत्वाची कामे केली आहे. या दरम्यान काहींना कोरोनाची लागण देखील झाली आहे, असेही वाघ यांनी म्हटले आहे.

यापूर्वी, भाजप नेते नितेश राणे यांनीही हे राज्य सरकारचे श्रेय नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की,”राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नसून त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणे हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखे आहे.”

तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे, असे म्हटले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.

धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. WHO चे महासंचालक म्हणाले की, ‘जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात.

मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या मार्गावर आहे. WHO च्या महासंचालकांनी धारावी मॉडेलचे कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर भर दिला आहे.”