महाविकास आघाडी सरकारच्या अथक परिश्रम व प्रयत्नामुळे महाराष्ट्रात कोविडची साथ नियंत्रणात : सुनील प्रभू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या योजने अंतर्गत राज्यात व्यापक प्रमाणात आरोग्य मोहीम राबवून जनतेत जनजागृती निर्माण केली. आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये वाढ केली. मास्क, पीपीई किटस्, ऑक्सीजन, तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध केली. देशात सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली असतानाही राज्य सरकारने वैद्यकीय व तांत्रिक डॉक्टरांचे राज्य कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले. महाविकास आघाडी सरकारच्या अथक परिश्रम व प्रयत्नामुळे महाराष्ट्रात कोविडची साथ नियंत्रणात आणण्यात यश प्राप्त झाले, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार सुनील प्रभू यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर आपण आकडेवारीसह विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कोरोना संदर्भात सविस्तरपणे आकडेवारीसह विश्लेषण केल्याचे प्रभू म्हणाले.

राज्यात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ३ कोटी आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दि. १६ जानेवारीपासून सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन मोफत लस देण्यास सुरुवात केली आहे. नुकताच १ मार्च पासून ६० वर्षावरील आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला. १ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ कोरोना रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के इतके आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ५५ हजार ७० इतकी आहे. तर आज पर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार १५४ इतकी आहे. मुंबईत अद्याप पर्यंत ३ लाख २३ हजार ८७७ इतके बाधीत रुग्ण आहेत. तर ११ हजार ४६१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रात एकूण चाचण्या १ कोटी ९२ लाख ४१६ इतक्या प्रचंड प्रमाणात करण्यात आल्यामुळेच करोना नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.

गेल्या मार्च २०२० पासून आत्तापर्यंत राज्यात ५१ हजार तर मुंबईत ११ हजार कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये अनेक कुटुंबातील कुटुंबाप्रमुखचाच अथवा कुटुंबातील कुटुंब प्रमुखांसह एका पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या असल्याने सदर कुटुंबे आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाच्या मृत्युमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य अथवा रोजगार शासनाने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनेचा गंभीर्यापणे विचार करा अशी सूचना आमदार प्रभू यांनीं केली.

दरम्यान, राज्यात करोनाची साथ आटोक्यात येत असताना माहे जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, अमरावती आदि भागासह संपूर्ण राज्यात दररोज 8 हजाराहून अधिक रुग्ण तर एकट्या मुंबईत काल 849 रुग्ण पॉझिटीव्ह होते. सदरहू वाढत्या संसर्ग साथीवर नियंत्रण आणण्यासाठी आघाडी सरकारने रुग्णालये सज्ज करुन गर्दीची ठिकाणे टाळणे, सार्वजनिक कामावर नियंत्रण आणणे, आवश्यक त्या ठिकाणी लॉकडाऊन करणे, आदि उपाययोजना सुरु आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच जनतेला माहे जून २०२१ अखेर पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यासाठी आघाडी शासन वचनबद्ध आहे, त्यादृष्टीने सरकार कार्यवाही करत असल्याची महिती त्यांनी दिली. मुंबई महापालिकेने देखील यंदाच्या बजेटमध्ये १ कोटी लसीकरणाचे लक्ष निर्धारित केले असून मुंबईतील ८ रुग्णालयांच्या पुनर्विकास आणि सुविधांसाठी १०० कोटीहून अधिक निधी उपलब्ध करुन दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली.