Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 232 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. अशातच लॉकडाऊन हळहळू शिथिल करण्यात येत आहे. परिणामी राज्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै रोजी 10 हजार 320 नवे रुग्ण आढळून आले होत तर 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे. याचदरम्यान राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंता वाढली आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 9449 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

राज्यात 971 पोलीस अधिकारी आणि 8478 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 219 पोलीस अधिकार आणि 1713 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.तर आतापर्यंत 7414 पोलिसांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर पुन्हा हजर झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत 9 पोलीस अधिकारी आणि 94 पोलीस कर्मचारी मिळून 103 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.