मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस महिन्याभरासाठी रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही ही कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई-गुजरात दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही गाडी 2 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान रद्द केली आहे.

मुंबई आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस गाडी महिनाभरासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांनी पुढील महिन्यासाठी तिकीट बूक केले आहे, त्याबद्दल लवकर माहिती दिली जाणार आहे. गेल्या वर्षी रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. त्यावेळी तिकीटांचे पैसे प्रवाशांना परत दिले होते. दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र चर्चा त्या दिशेनेच सुरू असल्याची स्पष्ट माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या काही दिवस निर्बंध कडक केले जाणार आहेत. मात्र लॉकडाऊन लागणारच नाही असे नाही, परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे टोेपे यांनी स्पष्ट केले आहे.