Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतल्यानंतर ‘ही’ लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका, सरकारनं सांगितला धोका; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतातील कोविशील्डवर दिसून येत आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स दिसल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य कर्मचारी अन् लस घेणाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविशील्डची लस घेतल्यानंतर 20 दिवसांच्या आत रक्ताच्या गुठळ्या तर होत नाहीत ना, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. कोणतीही लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळल्यास तातडीने लसीकरण केंद्रात जाण्याची सूचना केली आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर तीव्र स्वरुपाची डोकेदुखी, छातीत वेदना, शरीराला सूज, उलटी, पोटात वेदना, श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्यास तातडीने लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा. तसेच लस घेतल्यानंतर घेतलेला भाग सोडता शरीराच्या इतर कोणत्याही भागावर लाल रंगाचे चट्टे येतात का, याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे. तुम्हाला मायग्रेनची समस्या नाही आणि उलटीसोबत किंवा उलटीसह सतत डोकं दुखत असल्यास लसीकरण केंद्रावर जाऊन त्याची माहिती द्यावी असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. तसेच जास्त अशक्तपणा जाणवत असल्यास, शरीराच्या एखाद्या अवयवाने काम करणं बंद केल्यास, कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होत असल्यास, डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्यास, ताण-तणाव येत असल्यास लसीकरण केंद्राशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.