Corona Vaccination : 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनच्या चाचणीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटे देखील लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी कोरोनाविरोधातील लसीकरण कधी सुरु होणार ? तसेच या लसीकरणासाठीच्या चाचण्या कधी सुरु होणार ? अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्यावतीने नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही.के. पॉल यांनी मोठी घोषणा केली आहे.

कोव्हॅक्सिन लसीच्या 2 ते 18 वयोगटातील फेस दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) मान्यता दिली आहे. येत्या 10 ते 12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरु होईल, अशी माहिती डॉ. व्ही.के. पॉल यांनी दिली आहे. ही क्लिनिकल ट्रायल 525 जणांवर होणार आहे. दिल्लीतील एम्स, पटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागणार आहे.

कशी होणार चाचणी ?

DCGI ने ज्या शिफरशीला मंजुरी दिली, त्यानुसार चाचणीत 525 स्वयंसेवक असतील. त्यांचं वय 2 ते 18 वर्षांच्या दरम्यान असेल. इंजेक्शनद्वारे लसीचे डोस दिले जातील. पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. कोवॅक्सिनच्या सामान्य चाचणीमध्येही दोन डोस दरम्यान 28 दिवसांचे अंतर होते.

कर्नाटकात 15 दिवसांत 19 हजार मुलं संक्रमित

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिक वाढली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेपूर्वीच दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढली आहे. कर्नाटकात गेल्या 15 दिवसांमध्ये 19 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर दिल्लीत दोन लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ही आहेत लक्षणं ?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाची विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये सुमारे 10 वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये गॅस्ट्रोएंटेरायटीसचाही समावेश आहे. काही मुलांमध्ये त्वचेवर व्रण आणि अन्य त्वचारोग दिसून येत आहेत.