Corona Vaccination : कोरोना लस नोंदणी, किंमत आणि साईड इफेक्ट्स ‘या’ संदर्भातील सर्व माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली आहे. तसेच देशामध्ये 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. देशात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील सर्वसामान्यांना लस देण्यात आली. आता तीसऱ्या टप्प्यात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. परंतु कोरोना लसीच्या संदर्भात अनेकांच्या मनात शंका आहे. जाणून घ्या लसीबद्दलची सर्व माहिती.

कोरोना लस सर्वांना मोफत मिळणार का ?

केंद्र सरकारने 45 वर्षावरील, आरोग्य कर्मचारी, आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. परंतु जे लोक खासगी रुग्णालयात लस घेतील त्यांना प्रति डोस 250 रुपये मोजावे लागतील. दरम्यान 1 मे पासून 18 वर्षावरील लोकांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, छत्तीसगढ, केरळ, सिक्किम, बिहार, झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

कोव्हिशिल्डची किंमत किती ?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड लस तयार केली आहे. सीरमने तयार केलेल्या कोव्हिशिल्डची प्रति डोस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयासाठी 600 रुपये एवढी ठरवली आहे. तर हैदराबादच्या बायोटेक कंपनीची कोवॅक्सिनचे दर अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाहीत. तर नुकतेच मंजूरी देण्यात आलेली रशियन निर्मित स्पुटनिक-व्ही या लसीचे देखील दर निश्चित करण्यात आलेले नाहीत.

कोव्हिशिल्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक-व्ही ची तुलना ?

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात तीन लसींना मंजूरी देण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही ची तुलना होऊ शकत नाही. कारण या तीनही लसींचे ट्रायल भारतामध्ये घेण्यात आले आहे आणि तिन्ही लस कोरोना संसर्गावर प्रभावी आहेत. विशेष म्हणजे कोरोना लस घेतल्यानंतर संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होतं आहे आणि मृत्यू होण्याची शक्यता फारच कमी आहे.

कोवॅक्सिन – ही भारतीय निर्मित लस आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने मिळून ही लस तयार केली आहे.

कोव्हिशिल्ड – ही लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका संपादित आहे, जी भारतातील सीरमने बनवली आहे.

स्पुटनिक व्ही – ही लस रशियन निर्मित लस आहे. देशामध्ये यशस्वी ट्रायलनंतर नुकतीच या लसच्या वापराला मंजूरी मिळाली आहे.

लसीकरणासाठी कशी नोंद करायची

कोरोना लस घेण्यासाठी भारत सरकारने वेबसाईट तयार केली आहे. http://www.cowin.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागेल. तसेच केंद्र सरकारच्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याची प्रक्रिया मार्च 2021 पासून सुरु केली आहे. याशिवाय आरोग्य सेतू अ‍ॅपवरही नोंदणी करता येऊ शकते.

18 वर्षावरील व्यक्तीने कुठे नोंदणी करायची ?

1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. 18 वर्षावरील लोकांनी कोरोना लसीसाठी 28 एप्रिलपासून कोविन अ‍ॅप (http://www.cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर जाऊन नोंदणी करता येऊ शकते. नोंदणी केल्यानंतर मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. तसेच तुमच्या परिसरातील लसीकरण केंद्राविषयी माहिती दिली जाईल.

नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

कोविन अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर लस नोंदणी करण्यासाठी एक फोटो, ओळख पत्र लागतं. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर कार्ड, ड्रायविंग परवाना, एनपीआर स्मार्ट, पेन्शन पासबूक. लस घेतल्यानंतर अ‍ॅपद्वारे प्रमाणपत्रही दिले जाते.

दुसरा डोस घेण्यासाठी नाव नोंदणी करावी लागेल का ?

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. कारण पहिला डोस घेतल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या डोसची तारीख निश्चित केली जाते. अ‍ॅपद्वारे देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर देखील याची माहिती दिली जाते. लसीचा दुसरा डोस 29 दिवसानंतर आणि कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 45 दिवसानंतर दिला जातो.

नाव नोंदणी न करता लस घेता येईल का ?

कोरोनाची लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अ‍ॅपद्वारे नोंदणी करु न शकल्यास जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात लस घेऊ शकता. यासाठी फोटो, ओळख पत्र सोबत ठेवून तेथे जाऊन नोंदणी करता येईल.

लस निवडता येते का ?

भारतामध्ये उपलब्धतेनुसार कोरोनाची लस दिली जाते. त्यामुळे सध्यातरी असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

कोरोना लस मेडिकलमध्ये उपलब्ध आहे ?

आपात्कालीन स्थितीसाठी लस वापरण्यास मंजूरी आहे. त्यामुळे सध्या तरी कोरोनाची कोणतीही लस मेडिकलमध्ये उपलब्ध नाही.

लसचे साईड इफेकट्स काय आहेत ?

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर हलका ताप येणे, थंडी, शरीरात दुखणं जणवते, वीकनेस, डोकेदुखी, आळस, झोप येणे अशी लक्षणे आहेत. लसीकरणानंतर पॅरासिटामॉल घ्यावे. याशिवाय अधिक त्रास झाल्यात तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. तसेच देशामध्ये लहान मुलांना लस दिली जात नाही. दरम्यान, भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस 12 वर्षावरील मुलांना आपात्कालीन परिस्थितीत दिली जाते.

लस हर्ड इम्युनिटी वाढवते का ?

हर्ड इम्युनिटी वाढवण्यासाठी ही लस दिली जात आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही संसर्ग झाल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे व्हायरसच्या इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं.