जय महाराष्ट्र ! मुंबईत कोरोना लसीकरणाचा श्री गणेशा, शिवसेना नेत्यानं सपत्नीक घेतली लस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले, लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. कोरोनाचा प्रार्दुभाव संपवण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत होते, त्यांच्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने यश आलं आहे.

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील कोविड लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला, यावेळी लस आली म्हणजे निष्काळजीपणा बाळगायचा नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी जनतेला सल्ला दिला. त्याचसोबत क्रांतिकारक दिवस उजाडला असला तरी अद्याप संकट टळलेले नाही. त्यामुळे हात धुणे, मास्क लावणे सुरूच ठेवा…आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. बीकेसी येथील केंद्रात २०० जणांना आज लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, जागतिक स्तरावर सगळ्यात मोठ्या लसीकरणाला सुरूवात होत असून सर्व देशवासियांचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.

काहीच हाती नसताना आपण सगळे लढत होतो. ते दिवस आठवल्यावर आजही अंगावर शहारे येतात. तुम्ही सर्व होता म्हणून शक्य झालं, तुमच्यामुळे कोविड सेंटर ओस पडले आणि ते यापुढेही ओस पडलेले राहोत. कोरोना लसीकरण हे क्रांतिकारक पाऊल आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोविड योद्धांचे कौतुक केले. दरम्यान, कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यात राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत आणि त्यांच्या पत्नी अनिला सावंत यांनी कुपर हॉस्पिटलमध्ये पहिली लस घेतली. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी करण्यात आली आहे. राज्यात ८ लाख जणांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येणार आहे. त्यासाठी ५११ केंद्रे सज्ज झाली आहेत. लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने ‘कोविन’ ही डिजिटल यंत्रणा सरकारने उभारली आहे.

महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्त्यांनी लसीकरणाची सुरूवात झाल्यानंतर घाटकोपर परिसरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. इतिहासातील सर्वांत मोठे लसीकरण अभियान आहे. जगात १०० देश असे आहेत, ज्यांची एकूण लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. मात्र, भारत पहिल्या टप्प्यातच तीन कोटी लोकांना लस देणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ९ लाख ६३ हजार लसी पुरविण्यात आल्या आहेत.