‘कोरोना’मुक्त झालेल्यांना केवळ लसीचा एक डोस पुरेसा, पाश्चिमात्य देशात महत्त्वपूर्ण संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात बाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. दिवसाला तीन लाखाहुन अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशात लसीकरण मोहीम सुरु केली मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम बंद करण्यात आल्याचे वास्तव आहे. अशातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पाश्चिमात्य देशांनी केलेल्या संशोधनात कोरोनामुक्त झालेल्यांना केवळ लसीचा एक डोस पुरेसा असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोना लसीकरणाची रणनीतीच बदलू शकते.

पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं केलेल्या या संशोधनाची माहिती सायन्स इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज दोन प्रकारच्या असतात. टी किलर सेल्स अँटिबॉडी विषाणूला संपवतात. तर दुसऱ्या अँटिबॉडीज मेमरी बी सेल्स असतात. जर पुन्हा या व्यक्तीला कोरोना झाला तर प्रतिकारशक्तीला सतर्क करून विषाणूचा खात्मा करण्यासाठी किलर सेल्स तयार करण्याचं काम या अँटिबॉडीज करतात असं समोर आलं आहे.

पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील कोरोनमुक्त झालेल्या लोकांना लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्या. मात्र दुसऱ्या डोसला त्यांच्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद मर्यादित स्वरुपाचा होता. तर कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्यानंतर काही दिवसांनंतर परिणाम दिसून आले. अशा प्रकारचं संशोधन इटली, इस्रायलसह अनेक देशांमध्ये यापूर्वीच करण्यात आलं आहे.

या संशोधनानं काय साधलं?

नव्या संशोधनामुळे लसीकरणाची रणनिती बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे. या संशोधनानुसार फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनीसारख्या युरोपीय देशांमधील लसीकरण मोहिमेची रणनीती बदलण्यात आली. असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना दोन डोसऐवजी एकच डोस देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होऊन देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा इस्रायलनं केली. येथेही कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना केवळ एकच डोस देण्यात आला.