मोठी बातमी ! राज्यात लसींचा तुटवडा नाहीच, लाखो लसी शिल्लक पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर केंद्र सरकारकडून आवश्यक पुरवठा केल्याचे स्पष्ट केले आहे. या आरोप-प्रत्यारोपानंतर नवी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडे कोव्हॅक्सीनचे डोस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लसींचा साठा शिल्लक असतानाही अतिरिक्त लसींची मागणी केली जात आहे.

केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे राज्यात लसींचा तुटवडा झाल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र, राज्य सरकारकडे कोव्हॅक्सिनचे डोस असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लसी न संपवता नवा स्टॅाक का मागवताय? असा सवाल विचारला जात आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांत कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. पण राज्याकडे कोव्हिशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या लसी दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवायचा आदेश दिलेला आहे. कोव्हॅक्सिन दिलेले असल्याने त्यांचे पुढच्या टप्प्यातील लसीकरण करण्यासाठी या लसी शिल्लक ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

पुण्यात 67000 लसींची मात्रा

पुण्यातच 67000 लसींचा साठा शिल्लक आहे. अडचणीच्या काळात या लसी वापरायच्या का असा सवाल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मात्र, याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिला नाही.

लसींची मात्रा काही लाखांत…

राज्यांत आत्ताही कोव्हॅक्सिनच्या काही लाख मात्रा उपलब्ध आहेत. मात्र, 5 तारखेला काढलेल्या आदेशानुसार या संपुर्ण लसी दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती दिली जात आहे. या लसी शिल्लक असल्याने केंद्र सरकार नव्या लसी कशासाठी द्यायचा असा सवाल उपस्थित केला आहे.