आता ज्येष्ठांना मिळणार ‘कोरोना’वरील लस; 1 मार्चपासून होणार मोफत लसीकरण

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, कोरोना योद्धा म्हणून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. तर सर्वसामान्यांना लस अद्याप दिली गेली नाही. मात्र, आता देशातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. या लसीकरणाला 1 मार्चापासून सुरुवात होणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु होत आहे. यामध्ये 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. प्रकाश जावडेकर यांच्यानुसार, 1 मार्चपासूनच 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना गंभीर आजाराने ग्रासले आहे, अशा लोकांना लस दिली जाणार आहे. तसेच देशातील 10 हजार सरकारी सेंटरवर लोक लस घ्यायला जातील, तेव्हा त्यांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

खाजगी रुग्णालयात शुल्क

जर तुम्ही खाजगी रुग्णालयात लस घेण्यास गेला तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून या लशींच्या किमतीबाबतही लवकरच माहिती दिली जाणार आहे, असेही प्रकाश जावडेकर म्हणाले.

मंत्र्यांनी मोफत लस घेऊ नये

पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की ‘केंद्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी पैसे देऊन लस घ्यावी. इतकेच नाही तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मंत्र्यांनीही लसीसाठी पैसे द्यावे. मोफत लस घेऊ नये’.

आत्तापर्यंत 1 कोटी लोकांनी घेतली लस

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, की 16 जानेवारीपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 1.07 कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. तर 14 लाख लोकांना लसीकरणाचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.