केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘राज्यांना लसीकरणाचे स्वातंत्र्य, केंद्राने कोणत्याही पूर्व अटी घातल्या नाहीत’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान 18 वर्षांवरील व्यक्तींना लस सरकारी आरोग्य केंद्रांत द्यायची की खासगी रुग्णालयांत की अन्यत्र कुठे, याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य सर्व राज्यांना दिले आहे. यात केंद्र सरकारने कोणत्याही पूर्व अटी घातलेल्या नाहीत. हा केंद्र सरकार विरोधातील अपप्रचार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. परंतु 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे केंद्राचे धोरण या पुढेही सुरू राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. या टप्प्यात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस घेता येणार असून राज्यांनाही लसीकरणाचे स्वातंत्र्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, 45 वर्षांहून कमी वय असलेल्या नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रांमध्येच लस घेता येईल, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले असल्याचे वृत्त पूर्णत: खोडसाळपणाचे आहे. 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून खासगी रुग्णालयांत लस घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.