Coronavirus Vaccination : कोरोनातून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?; तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घ्यायची असेल तर कधी घ्यायची हे अनेकांना माहिती नसेल. मात्र, आता याबाबत माहिती घेणार आहोत…

अमेरिकेच्या ‘हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’नुसार, जर एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीला लसी दिली गेली नसेल तर त्यांना कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्हच्या पहिल्या दिवसापासून 90 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या अहवालात इम्युनोलॉजिस्ट डॉक्टर विनिता बाळ यांनी सांगितले की, ‘कोरोनापासून बरे झाल्यानंतर लसी घेण्यासाठी सहा ते आठ आठवडे थांबले पाहिजे’.

डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटले, ‘सहा महिने थांबणे चांगले राहील. नैसर्गिक संसर्गानंतर 6 महिने लसीकरण टाळणे चांगले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कारण नैसर्गिक अँटिबॉडीज शरीरात इतके दिवस राहण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीस पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास, तो पॉझिटिव्ह आल्यापासून 8 आठवड्यांनंतर त्यांना दुसरा डोस दिला जाऊ शकतो.

लसीकरण वेगाने सुरु

देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार, आता लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात लसींअभावी हे लसीकरण होऊ शकले नाही.