Corona Vaccine : ‘सीरम’च्या लशीला भारतातच आलाय मोठा ‘भाव’; इतर देशांत स्वस्त मिळतेय Covishield लस

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठा आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस प्रभावी ठरत आहे. मात्र, आता याच लसींचे भारतात दर जास्त असून, श्रीलंका, बांगलादेश या देशांत ही लस खासगीमध्ये मिळणाऱ्या लसींपेक्षाही कमी किमतीत मिळते.

देशात कोरोना परिस्थिती बिकट बनली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर देशात 1 लाख 89 हजार 544 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 1 मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. पण या लसींच्या किमती इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक असल्याची माहिती दिली जात आहे. सौदी अरेबियामध्ये ही लस 5.25 डॉलर्सला मिळणार आहे. तर युरोपियन युनियनमध्ये ही लस 2.15 ते 3.50 डॉलर्समध्ये मिळणार आहे. भारतनिर्मित ही लस मात्र भारतातच सर्वाधिक किमतीत मिळणार आहे. ही लस 8 डॉलर्सना असेल.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयांत विकली तरी नफ्यात राहू असे विधान लस बाजारात येण्यापूर्वी केले होते. मात्र, आता सध्याची परिस्थिती पाहता कोव्हिशिल्ड ही भारतातच सर्वात जास्त किंमतीला विकली जात आहे.

खासगी रुग्णालयांत 600 रुपयांना लस

सीरम इन्स्टिट्युने भारताला पहिल्या दहा कोटी लसींची मात्रा 150 रुपयाला दिल्या होत्या. मात्र, आता राज्य सरकारला 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये दराने लसींची खरेदी करावी लागणार आहे. लसींचे हे दर भारतातच सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत 4 डॉलर्सला लस

सीरमची कोव्हिशिल्ड ही लस भारतात 8 डॉलर्सला मिळणार आहे. अमेरिकेत 4 डॉलर्स, ब्राझीलमध्ये 3.15 डॉलर्स, सौदी अरेबियामध्ये 5.25 डॉलर्स तर बांगलादेशला 4 डॉलर्स आणि श्रीलंकेत 4.50 ते 5 डॉलर्सला मिळणार आहे.