‘सिरम’चे CEO अदर पूनावाला यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीची मागणीही वाढली आहे.मात्र अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच लसीचे उत्पादन ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे. पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भावूक आवाहन केले आहे. पूनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती बायडन यांना केली आहे.

 

 

 

 

 

पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायच असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घातलेले निर्बंध हटवा. जेणेकरून लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे. सिरम इन्स्टिट्युट कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. भारतामध्ये या लसीच्या वापराला पहिल्यांदा मान्यता मिळाली होती. तसेच या लसीची अनेक देशांना निर्यातही होत आहे. सिरम इन्स्टिट्युट ही जगातील सर्वाधिक लसींची निर्मिती करते. दरम्यान सीरम इन्स्टिट्युट अमेरिकेकडून विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आयात करते. त्याची यादी मोठी आहे. आयत्यावेळी पुरवठादार शोधण्यास उशीर लागणार आहे. कंपनी नवा पुरवठादार शोधत आहे. सहा महिन्यांनंतर अमेरिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. मात्र कंपनीला सध्या कच्च्या मालाची गरज आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.