Pune News : पुण्यात ‘या’ 8 ठिकाणी मिळणार ‘कोरोना’ लस, 48 हजार डोस उपलब्ध

पुणे (pune) : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर अखेर लस उपलब्ध झाली असून आज पासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. देशभरात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यात (pune) देखील आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत लसीकरण होणार आहे.

लसीकरणासाठी आठ केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे महापालिकेकडे कोविड लसीचे 48 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यातील 10 टक्के वेस्टेज वगळल्यावर अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोस दिले जाणार आहेत.

या रुग्णालयात होणार लसीकरण

1. कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह
2. कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
3. ससून रुग्णालय, पुणे स्टेशन
4. सुतार दवाखाना, कोथरुड,
5. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा
6. रुबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता
7. नोबेल हॉस्पिटल, हडपसर
8. भारती हॉस्पिटल, धनकवडी

पुण्यातील आठ प्रमुख रुग्णालयातील लसीकरणासाठीचे कक्ष- निरीक्षण कक्ष, आरोग्य कर्मचारी सज्ज होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी उपस्थित होते. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये डॉ. अनुज दरग यांना 11 वाजून 05 मिनिटांनी पहिली लस देण्यात आली. कमला नेहरू रुग्णालयात डॉ. विनोद शहा यांना लस देण्यात आली. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. नितीन उगले यांना पहिली लस देण्यात आली.