Coronavirus : पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधितांपैकी 23 जण 6 कुटुंबातील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून वाढणारी संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण सहा रुग्णांपैकी जवळपास निम्मे म्हणजे 23 रुग्ण सहा कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. सध्याची रुग्णाची परिस्थिती पाहता बाधित व्यक्तीनेच कुटुंबातील व्यक्तींना संक्रमीत केल्याचे समोर आले आहे. कोरोना सदृश लक्षणे असल्यास नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांपासून स्वत:हून क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. तसेच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा आपले कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडू शकते असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

धनकवडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर याच महिलेच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये महिलेचा पती, मुलगा, बहीण, बहिणीचा पती व मुलगी यांचा समावेश आहे. कर्वे रस्त्यावरील खासगी रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्याची आई-वडील, पत्नी, भाऊ व त्याची पत्नी यांचा समावेश आहे. या दोन कुटुंबातीलच 12 जण उपचार घेत आहेत.

मुकूंदनगर भागातील झोपडपट्टीतील दुबईला गेलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या मुलीलाही लागण झाली. तर बर्म्युडा येथून आलेल्या पतीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली. पिंपरी चिंचवड मधील एकूण 12 जणांपैकी चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यापैकी एक जण दुबईवरून आला होता. तो बाधित असल्याने इतर तीन जणांना संसर्ग झाला. सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 वर गेला असताना त्यातील निम्मे रुग्ण सहा कुटुंबातील आहेत.

पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेले रुग्णच कुटुंबातील व्यक्तींना संक्रमीत करत असल्याचे रुग्णाच्या स्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आल्यास स्वत: हून क्वारंटाईन व्हावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर केल्यास कुटुंबाला पहिला संसर्ग होऊ शकतो.