Coronavirus : औरंगाबादमध्ये ‘करोना’चा पहिला रूग्ण आढळला, राज्यातील संख्या 32 पार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले. तर आज औरंगाबादमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. औरंगाबादमधीलल 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित महिला रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास करून पुन्हा भारतात आली होती. या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील धूत रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. त्यानंतर नवी मुंबई, मुंबई, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ जिल्ह्यानंतर आता औरंगाबादमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले.

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात कोरोना संशयीत रुग्णाचा पहिला मृत्यू झाला आहे. या रुग्णावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्याचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नसून स्वॅबचे रिपोर्ट आल्यानंतर या रुग्णाला कोरोना झाला होता की नाही हे समजेल असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

कोणत्या शहरात किती रुग्ण
पुणे – 10
नागपूर – 4
यवतमाळ – 2
ठाणे, अहमदनगर, कल्याण, पनवेल, नवी मुंबई, औरंगाबाद – प्रत्येकी 1
मुंबई – 5