Pune : पालिकेतील 9 हजार अधिकारी, कर्मचारी ‘कोरोना’ ड्युटीतून मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोना आपत्तीत दिवसरात्र काम करणाऱ्या पुणे महापालिकेतील सुमारे 9 हजार अधिकारी व कर्मचारी यांना तूर्तास कोरोना डयुटीतून कार्यमुक्त (9000-officers-and-employees-pune-municipal-corporation-released-corona-duty) केले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व्यतिरिक्तच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना डयुटीतून मुक्त केले आहे.

पुणे शहरात 9 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला व काही दिवसातच म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन झाले. दरम्यान केंद्रीय व राज्य आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग वाढीचे संकेत दिल्याने, महापालिकेनेही शहरात कोरोना तपासणी केंद्र, विलगीकरण केंद्र, उपचारासाठी बेडसची संख्या वाढविणे आदीसह इतर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. परिणामी मनुष्यबळ अभावी महापालिकेने आपल्या सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती कोरोना आपत्ती निवारण्याच्या कामाला लावली.

शहरात अधिक रुग्ण आढळणाऱ्या परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, घरोघरी जावून सर्वेक्षण करणे, संशयितांना टेस्टिंग सेंटर, विलगीकरण कक्ष अथवा रुग्णालयात दाखल करणे, अशी अनेक कामे अहोरात्र सुरू झाली. यासाठी पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी, पीएमपीकडील सुमारे 2 हजार 300 चालक व वाहक, शिक्षण मंडळाकडील 2 हजार 300 शिक्षक असे मनुष्यबळ अहोरात्र कार्यरत होते. यासोबतच कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली होती.

ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच शहरात कोरोना रूग्ण संख्या कमी होत गेले़ तसेच सौम्य लक्षणे असलेल्या बहुतांशी रूग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्विकारल्याने पालिकेच्या विलगीकरण केंद्रांवरील ताण कमी झाला.परिणामी शहरातील 21 विलगीकरण कक्ष बंद केले. त्यामुळे आरोग्य विभाग वगळता अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना ड्युटीतून मुक्त करण्यास सुरुवात केली आहे.

आजपर्यंत 9 हजार जणांना या कामातून मुळ कामी पूर्णवेळ नियुक्त केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच पीएमपी, शिक्षण मंडळासह सर्वच विभागातील कोरोना ड्युटीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना कोरोना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. आगामी काळात आवश्यकता निर्माण झाल्यास पुन्हा कोरोना डयुटीवर नियुक्त करण्यात येईल असे सांगितले आहे.