Coronavirus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास कारवाई करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचे संकट असताना पुणे विभागातील खासगी डॉक्टरांनी कोरोना विषाणूच्या भीती पोटी दवाखाने बंद ठेवल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून खासगी दवाखाने व ओपीडी बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर त्वरीत आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

कोरोना संशयितावर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, क्लिनिक बंद ठेवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने व ओपीडी सुरु ठेवण्याचे आवाहन करण्याचे आदेश दिले आहेत.

खासगी डॉक्टरांना आवाहन करून देखील त्यांनी आपले दवाखाने, क्लिनिक बंद ठेवले. तर त्यांच्यावर थेट आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोविड उपयाययोजना 2020 व साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच संबंधित डॉक्टरची नोंदणी त्वरित रद्द करण्याची शिफारस इंडियन मेडिकल कौन्सिल व अन्य सक्षम प्राधिकरणाकडे करण्याचे आदेश दिले आहेत.