Corona Virus : ‘करोना’चा हाहाकार ! चीनमध्ये एकाच दिवशी 242 जणांचा मृत्यू, आकडा 1300 पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी चीनमध्ये एकाच दिवशी 242 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या व्हायरसची दहशत अधिकच वाढली असून डॉक्टरांकडून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चीनच्या बुहान प्रांतामध्ये करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी करोनाची बाधा झालेले 14 हजार 840 रूग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. चीनच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत 60 हजार जणांना करोना व्हायरसची बाधा झाल्याचे वृत्त आहे. करोनामुळे चीनला मोठ्या प्रणावर आर्थिक नुकसानही सहन करावे लागलत आहे. चीनमध्ये होणारी जागतिक मोबाईल काँग्रेसही यामुळे रद्द करण्यात आली आहे.

हुबेई प्रांतात आरोग्य व्यवस्थेबाबत हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने हुबेईचे प्रांत प्रमुख जियांग चाओलिंआंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी शांघाईच्या महापौरांना याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, हाॅंगकाँगमध्ये या रोगाची लागण झालेल्या 49 पैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही माहिती मंगळवारची आहे.

चीनच्या मकाऊ आणि तैवान येथे अनुक्रमे 10 आणि 18 जणांची टेस्ट करण्यात आली. त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर जपानच्या किनाऱ्यावर असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील दोन भारतीयांना याची लागण झाल्याचे वैद्यकीय चाचणीत समोर आले आहे. त्यांना रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच रशियामध्ये दोन महिलांना करोना व्हायरची लागण झाली आहे. परंतु या महिलांनी रुग्णालयाच्या स्वतंत्र कक्षातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.