Coronavirus : ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायजर’चा काळाबाजार केल्यास 7 वर्षांचा ‘कारावास’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जेव्हापासून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे, तेव्हापासून देशात मास्क आणि सॅनिटायजरची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. लोकांची तक्रार आहे की, बाजारात या दोन वस्तू उपलब्ध नाहीत आणि जर असतील तर दुकानदार दुप्पट पैसे उकळत आहेत. मोठ्या प्रमाणात या वस्तूंचा काळाबाजार होत आहे.

आवश्यक वस्तू घोषित झाल्या मास्क आणि सॅनिटायजर

आता मोदी सरकारने मास्क आणि सॅनिटायजरची कमतरता दूर करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. सरकारने या दोन्ही वस्तू आवश्यक वस्तू म्हणून घोषित केल्या आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना या वस्तूंचे उत्पादन, गुणवत्ता आणि विक्रिचे नियोजन करण्याचे आधिकार प्राप्त होतात. ग्राहक प्रकरणात मंत्रालयात आवश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. सोबतच, सरकारने वजनकाटा कायद्यांतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, जेणेकरून मास्क आणि सॅनिटायजर किरकोळ विक्री किमतीत म्हणजे एमआरपीवर विकले जावे.

7 वर्षांचा होऊ शकतो कारावास

सध्या या वस्तू 30 जून 2020 पर्यंत आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदी अंतर्गत याचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांचा कारावास होऊ शकतो. याशिवाय दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना योग्य किंमतीत आवश्यक वस्तू मिळतील, असे सरकारला वाटत आहे.

ग्राहक हेल्पलाईनवर तक्रार करू शकता

सोबत ग्राहक मंत्रालयाने लोकांना केंद्र आणि राज्य स्तरावर काम करणारी राष्ट्रीय हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी फोन नंबर 1800-100-400 वर कॉल करून तक्रार दाखल करू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहक हेल्पलाइनच्या वेबसाइटचा उपयोगसुद्धा करू शकता.