CM ठाकरेंची PM मोदींना विनंती, म्हणाले – ‘आम्हाला हवाई वाहतुकीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून बेड, रेमडेसीव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी (दि. 13) रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची विदारक परिस्थिती कथन केली. राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला हवाई वाहतुकीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री 8.30 वाजता राज्यातील जनेतशी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जनतेला सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची विदारक परिस्थिती कथन केली. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

राज्याला ऑक्सिजनची मोठी गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींना मी विनंती करतो की, हवाई वाहतुकीने ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी वायू दलाला आदेश देऊन आम्हाला मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.