Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्तानं केला होता भुवनेश्वर एक्सप्रेसमधून ‘प्रवास’, संपर्कात आले होते 129 प्रवाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या सतत वाढत चालली आहे. आतापर्यंत 131 लोकांना याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान भुवनेश्वर एक्सप्रेसमध्ये कोविड-19 चा संसर्ग झालेल्या एका प्रवाशाने प्रवास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती इतर 129 लोकांच्या संपर्कात आला, ज्यामध्ये 76 सहप्रवाशी होते. त्याच्या प्रवाशाच्या माहितीनुसार तो इटलीहून परतला होता. यानंतर रेल्वे टीटीईसह अन्य स्टाफला सेल्फ क्वारेंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वेने भुवनेश्वर राजधानीच्या कॅटरिंग स्टाफच्या 2 कर्मचार्‍यांना ओडिसाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. दोन दिवसांपूर्वी इटलीहून परतलेल्या एका प्रवाशाने या ट्रेनने प्रवास केला होता. ही ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहचली होती. राजधानीच्या एका कोचला ओडिशात वेगळे करण्यात आले होते. वेटरने रेल्वे अधिकार्‍यांना सांगितले की, तो ट्रेनमध्ये एका प्रवाशाला भेटला होता, ज्याची प्रकृती ठिक नव्हती.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी सर्व शैक्षणिक संस्था, सिनेमा, मल्टीप्लेक्स आणि पर्यटनस्थळे 2 एप्रिलपर्यंत बंद केली आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की, सीएम योगी आदित्यनाथ यांनी सर्व शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था 2 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. स्पर्धा आणि अन्य परीक्षा 2 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

दिल्लीच्या नोएडामध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे दोन रूग्ण सापडले आहेत. नोएडा सेक्टर-100 मध्ये एक महिला आणि एक पुरूष कोरोना व्हायरसने पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. दोघांना त्यांच्या कुटुंबासह क्वारेंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी 31 मार्चपर्यंत सर्व जिम, नाईट क्लब बंद केले आहेत.

तर भारत सरकारने कोरोनाच्या रूग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्याची नवी पॉलिसी जारी केली आहे. यानुसार 24 तासात दोन वेळा सॅम्पल टेस्ट केल्या जातात आणि दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच डिस्चार्ज दिला जातो. कारण रूग्ण पूर्ण बरा झाला आहे हे समजणे आवश्यक आहे. रूग्ण पूर्ण बरा झाला नाही तर तो पुन्हा व्हायरसचा संसर्ग पसरवू शकतो.