लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी दिलासा ! ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ देशातील ‘या’ मार्गावरुन धावणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे. लॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामगार, येत्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तिंना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी 1 मे कामगार दिनापासून ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

6 ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’
लॉकडाऊमुळे अडकलेल्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी 6 ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत. या गड्या लिंगापल्ली ते हटिया, अलुवा ते भुवनेश्वर, नाशिक ते भोपाळ, जयपूर ते पाटणा, नाशिक ते लखनऊ आणि कोटा ते हटिया या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, या स्पेशल ट्रेनमधून अडकलेल्या लोकांना नेण्यासाठी आणि आणण्यासाठी प्रोटकॉलनुसार संबंधित राज्या सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या चावलण्यात येणार आहेत. ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्यासाठी यामध्ये सुसुत्रता यावी यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

प्रवाशांची तपासणी होणार
प्रवाशांना पाठविणाऱ्या राज्यांमार्फत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येईल. केवळ तेच प्रवासी प्रवास करतील त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण नाहीत आणि अशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था संबंधित राज्यांकडून करण्यात येईल.

रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंग
राज्यातील संबंधित रेल्वेस्थानकावर प्रवासी पोहचल्यानंतर राज्यांकडून प्रवाशांचे स्वागत केले जाईल. यावेळी रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंग करण्यात येणार असून स्क्रीनींग झाल्यानंतर पुढील प्रवासाची सोय राज्यांना करावी लागेल. तसेच आवश्यकता असल्यास प्रवाशांना क्वारंटाईन देखील केले जाऊ शकते.