मोदी सरकारनं 2 आठवड्यांसाठी वाढवलं लॉकडाऊन, ‘या’ गोष्टींना परवानगी तर ‘या’ गोष्टी राहणार बंदच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाचे संकट सतत वाढत असून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू आहे. याच दरम्यान कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आले आहे. आता लॉकडाऊन देशात १७ मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

खरंतर लॉकडाऊन २.० मे रोजी संपणार होते. मात्र, यापूर्वी मोदी सरकारकडून देशभरात लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ४ मेपासून १७ मेपर्यंत हे लॉकडाऊन ३.० लागू राहील. या कालावधीत गृह मंत्रालयाने चालू राहणाऱ्या कामांसाठी एडव्हायजरी देखील जारी केली आहे.

ई-कॉमर्सला परवानगी
पण मोदी सरकारने यावेळी लॉकडाऊनमध्ये थोडीशी सवलत दिली आहे. ही सवलत लक्षात घेता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये बर्‍याच सवलती देण्यात आल्या आहेत. यात ई-कॉमर्सलाही सवलत जाहीर केली असून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला मान्यता देण्यात आली आहे. या झोनमधील अनावश्यक वस्तूंच्या ऑनलाइन डिलिव्हरीला सवलत देण्यात आली आहे. यासोबत ग्रीन झोनमध्ये ५० टक्के प्रवाशांसह बसेस चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन झोनमधील बस डेपोमध्ये केवळ ५० टक्केच कर्मचारी काम करतील.

मॉल्स-पब्स राहणार बंद
मात्र, या काळात बर्‍याच गोष्टींवर बंदी घातली जाणार आहे. लॉकडाऊन दरम्यान शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था १७ मे पर्यंत बंद राहतील. याशिवाय मॉल, पब वगैरेही बंद राहतील. या काळात हवाई, रेल्वे आणि मेट्रोद्वारे प्रवास करण्यास बंदी असेल.

आतापर्यंत किती रुग्ण ?
देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत असून आतापर्यंत देशात ३५,३६५ कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. यापैकी ११५२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ९०६५ लोकांवर उपचार केले गेले आहेत.