Coronavirus : जगातील पहिल्या ‘कोरोना’च्या रूग्णाची ‘आपबीती’, सांगितलं ‘कसा’ झाला ‘संसर्ग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगातील सुमारे 7 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर या विषाणूमुळे 32 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कोरोना विषाणूची लागण झालेला जगातील पहिला रुग्ण कोण आहे ?

जगातील कोरोना विषाणूची पहिली रुग्ण म्हणून चीनमधील 57 वर्षीय महिलेची ओळख पटली आहे. जी चीनच्या वुहानमध्ये कोळंबी विकत असे. तिचे नाव वेई गुईजियान आहे आणि तिला पेशंट झिरो असे म्हटले जात आहे. पेशंट झिरो त्या रुग्णास म्हणतात, ज्यात प्रथम एखाद्या रोगाची लक्षणे दिसतात. तथापि, आता कोरोनाच्या पेशंट झिरोमध्ये विषाणूची उपस्थिती संपली आहे. सुमारे एक महिना चाललेल्या उपचारानंतर, ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे. जानेवारीतच महिलेला कोरोना विषाणूपासून मुक्त करण्यात आले होते. तथापि, ही लक्षणे ज्या महिलेत पहिल्यांदा दिसली, तीच महिला कोरोनाची पहिली रुग्ण असेल असे म्हणणे उचित ठरणार नाही.

एका चिनी वृत्तसंस्थेनुसार, ही महिला पेशंट झिरो असल्याची बातमी जगभरातील मीडियाची मुख्य बातमी ठरली आहे. जगभरातील माध्यमांच्या वृत्तानुसार, 10 डिसेंबरला वुहानमधील सी फूड मार्केटमध्ये जेव्हा ती कोळंबी विकत होती तेव्हा या महिलेस लागण झाली होती.

या महिलेने सांगितले की, ‘मला थंडीच्या हंगामात प्रत्येक वेळी सर्दी होते. 10 डिसेंबर रोजी असाच प्रकार घडला. मला जरा कंटाळा येऊ लागला. मी त्याच दिवशी जवळच्या क्लिनिकमध्ये गेले आणि औषध घेतल्यानंतर पुन्हा बाजारात माझे काम सुरू केले. जेव्हा माझी प्रकृती बिघडू लागली, तेव्हा मी वुहानमधील द इलेवंथ रुग्णालयात डॉक्टरांना दाखवले. तिथेही माझ्या आजाराचे निदान झाले नाही आणि मला औषधे देण्यात आली.

कोरोना विषाणूच्या पहिल्या 27 रुग्णांमध्ये या महिलेचा समावेश

यानंतर 31 डिसेंबर रोजी ही महिला कोरोना विषाणूमुळे पीडित असल्याचे सांगण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झालेल्या 27 रुग्णांमध्ये ही महिलाही होती. सुरुवातीला चिनी प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याने या महिलेद्वारे तिच्या कुटूंबाला आणि नंतर बर्‍याच लोकांना हा संसर्ग झाला. चीनी प्रशासनाने डिसेंबरच्या उत्तरार्धात या महिलेस क्वारंटाईन केले.

अमेरिकन मीडियाने या महिलेस संबोधले पहिला रुग्ण

असे अनेक अहवाल आहेत ज्यानुसार चीनने अशा किमान 250 लोकांना ओळखले आहे ज्यांना 2019 मध्येच कोरोना विषाणूची लागण झाली. अमेरिकन मीडियानेही या महिलेचे पहिले रुग्ण असल्याचे सांगितले होते, पण ही महिला पेशंट झिरो असल्याचे चीनी सरकारने नाकारले होते.

चीनचा सिद्धांत वेगळा

त्याच वेळी चीनचा सिद्धांत असा आहे की हा विषाणू यूएस सैन्याच्या प्रयोगशाळेने तयार केला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दिक लढाई सुरू झाली होती. या 57 वर्षीय महिलेने म्हटले आहे की, जर चीन सरकारने वेळीच पावले उचलली असती तर मृतांची संख्या कमी झाली असती.