Coronavirus : नाशिकमध्ये ‘कोरोना’ची लागण झाल्याच्या भीतीने तरुणाने घेतला गळफास

पोलिसनामा ऑनलाईन – देशासह महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. अशाच भीतीमुळे नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड येथील चेहडी पंम्पिंग स्टेशन जवळ एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संबंधित तरुणाला गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याने परिसरातील डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. पण, तरीही सर्दी आणि खोकला काही कमी होत नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र, कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने तरुणाला ग्रासले होते. त्यातूनच त्याने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कोरोना झाल्याची भीती व्यक्त करुन आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरुणाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करत आहे.