Coronavirus Impact : गायीच्या दूधापेक्षा जास्त महाग दरानं विकलं जातंय ‘गोमूत्र’ आणि ‘शेण’, 500 रूपये झाला ‘भाव’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊनचे वातावरण आहे. इराण आणि इटली सारख्या देशात स्थिती आणखी गंभीर झाली आहे. तर भारतात आतापर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढून 138 झाली आहे आणि विविध राज्यांनी यास महामारी घोषित केले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवरील उपचार हा लोकांमधील चर्चेचा विषय झाला आहे. एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असतानाच देशात गोमूत्र आणि गायीच्या शेणाचे दर वाढले आहेत.

इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, गोमूत्र 500 रुपये लीटर आणि गायीचे शेण 500 रुपये किलोने विकले जात आहे. पश्चिम बंगालच्या एका दूध विक्रेत्याने दावा केला आहे की, कोलकातापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या रस्त्याच्या कडेला त्याने दुकान लावले आहे, जेथे गोमूत्र आणि शेण विकले जात आहे. विक्रेता माबूद अलीने सांगितले की, दूधाच्या तुलनेत जास्त कमाई गोमूत्र आणि गायीच्या शेणात होत आहे. गोमूत्र आणि गाईचे शेण 500 रुपयांनी विकले जात आहे.

दिल्लीतील गोमूत्र पार्टीतून सूचली कल्पना

दिल्ली आणि कोलकाताला जोडणार्‍या नॅशनल हायवे वर असलेल्या अलीच्या दुकानात शेण आणि गोमूत्राचे जार आणि पॅकेट विक्रीसाठी ठेवले आहेत. अली ने अपल्या दूकानात एक पोस्टर लावले आहे, ज्यावर लिहिले आहे – गोमूत्र प्या आणि कोरोना  व्हायरसपासून बचाव करा. त्याने दावा केला आहे की, दिल्लीत आयोजित हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीतून मला ही कल्पना सूचली. अलीकडे दोन गाई आहेत. एक देशी आणि एक जर्सी आहे. जेव्हा त्याने टीव्हीवर गोमूत्र पार्टी पाहिली, तेव्हा त्याला ही कल्पना सूचली की, तो गोमूत्र आणि शेण विकून अधिक पैसे कमावू शकतो.

अखिल भारतीय हिंदू महासभेने दावा केला होता की, गोमूत्र प्यायल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पिण्यासाठी एका गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले होते.