Corona Virus : ‘कोरोना’मुळे विमानसेवा बंद, कोल्हापूरचे 34 जण इराणमध्ये अडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा इतर देशात देखील शिरकाव झाला आहे. याचा परिणाम विमानसेवेवर झाला असून अनेक देशांनी विमानसेवा बंद केली आहे. काही देशांनी तर अलर्ट जारी केला आहे. कोरोनाची धास्ती घेऊन इराणने चीनसह भारत आणि इतर आशियाई देशात जाणारी विमानसेवा बंद केली आहे. इराणच्या या भूमिकेमुळे भारतीयांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 34 जण इराणमध्ये अडकून पडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी इराणमध्ये कोल्हापूरातील 34 जण अडकल्याची माहिती उघड केली आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडे सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसं पत्रही त्यांनी जयशंकर यांना दिलं आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विमान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील एकूण 34 जण इराणमध्ये अडकले आहेत. या सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सुप्रिया सुळे यानी जयशंकर यांना केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी हे आवाहन करताना सोबत सर्वच्या सर्व 34 भारतीयांची नावं, त्यांच्या पासपोर्टचा तपशीलही जोडला आहे. 21 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमधील हे लोक तेहराणला गेले होते. त्यानंतर ते इराकपर्यंत पोहोचले.

मात्र करोना व्हायरसच्या उपद्रव वाढल्याने सर्व पर्यटकांसाठी इराकची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. या सर्व भारतीयांनी 28 फेब्रुवारी रोजीच भारतात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, परदेशात जाणारी विमानसेवा बंद करण्यात आल्याने हे लोक तेहराणमध्येच अडकून पडले आहेत. हे सर्वजण ठरल्याप्रमाणे 3 मार्च रोजी भारतात येणार होते. विमानसेवा बंद झाल्याने त्यांना भारतात येणे शक्य झालं नाही. तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणावे, असे आवाहन सुळे यांनी परराष्ट्र मंत्र्यांना केले आहे.