भारतातील कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांत PM मोदीवर प्रचंड टीका, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहे. रुग्णालये आणि स्मशानांतही जागा मिळणे कठीण झाले आहे. सामूहिक अंत्यसंस्कारांचे फोटोही आंतरराष्ट्रीय माध्यमांत पसरताना दिसत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात निवडणूक सभा आणि कुंभ मेळा आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे या माध्यमात म्हटले आहे.

सर्वात नवे वृत्त अमेरिकेतील टाइम मॅक्झिनमध्ये How Modi Failed Us शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले आहे. भारतातील मजबूत सरकारने गोष्टींकडे दूर्लक्ष केल्याचे यात म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीत कमतरतेसाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या वृत्तात म्हणण्यात आले आहे की, पंतप्रधानांनी कुंभ मेळा सांकेतिक पद्धतीने करा, असे आवाहन करण्यास उशीर केला. तसेच, उपचारांअभावी हजारो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र, देशातील मोठे नेते निवडणूक प्रचारात व्यस्त होते, असे या वृत्तात म्हटले आहे. द टाइम मॅक्झिनप्रमाणेच अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स आणि इग्लंडमधील न्यूजपेपर द गार्डियननेही वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने As Covid 19 Devastates India, Deaths Go Undercounted शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले आहे. जेंव्हा कोरोनाने भारतात थैमान घातले होते. तेंव्हा मृत्यूची संख्या कमी सांगितली जात होती. आकड्यात हेराफेरी केली जात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. द ऑस्ट्रेलियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, अहंकार, अती राष्ट्रवाद आणि नोकरशाहीच्या अयोग्यतेने भारतात कसे कोरोना संकट वाढले. यातच गर्दी आणि गर्दीत राहणे पसंत करणारे पंतप्रधान आपल्यातच व्यस्त राहिले आणि नागरिक गुदमरत राहिले. द ऑस्ट्रेलियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तासंदर्भात कॅनबरा येथील भारतीय दुतावासाने तीव्र आक्षेपही व्यक्त केला आहे.