Coronavirus : ‘कोरोना’चा देशातील 7 वा बळी, 69 वर्षाच्या वृध्दाचा सूरतमध्ये मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात यामुळे ७ व्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान गुजरातमधील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. माहितीनुसार, सूरत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही कोरोना ग्रस्त व्यक्ती रेल्वेने दिल्ली व जयपूरहून सूरत येथे आली. रुग्ण आधीच मूत्रपिंड आणि दम्याच्या आजाराने झगडत होता.

गुजरातमधील पहिले कोरोना पॉझिटिव्ह प्रकरण सुरतमधूनच समोर आले होते आणि आता पहिल्या मृत्यूची नोंदही सूरतमध्ये झाली आहे. यासह रविवारी कोरोना विषाणूमुळे देशात तिसरा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बिहारची राजधानी पटना येथे कोरोना संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. बिहारमधील या साथीच्या आजारामुळे हा पहिलाच मृत्यू आहे. मृताचे वय 38 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी रविवारी महाराष्ट्रात कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय 63 वर्षे असल्याचे सांगितले गेले. ती व्यक्ती मधुमेह, हायपर टेन्शन आणि हृदयाची रुग्ण होती. यापूर्वी महाराष्ट्रात मृत्यू झालेल्या पेशंटचे वय 56 वर्ष होते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 74 झाली आहे. संपूर्ण भारतभरात ही संख्या वाढून 355 झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोन प्रभावित राज्य आहे.