Coronavirus : बिहारमध्ये साथीच्या रोगाचा कायदा लागू, सहकार्य न केल्यास होणार शिक्षा

पाटणा : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान घातले असून अतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे 150 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना आखली असून राज्यातील सर्व मंदिरे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

नितीश कुमार सरकारने राज्यात कोरोना व्हायरसला साथीचा रोग जाहीर केला आहे. बिहार सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी, तपासणी आणि उपचार करण्यास सहकार्य न करणाऱ्यांवर सामाजिक हित कायद्यानुसार करवाई करणे आणि यासाठी प्रशासनाला व्यापक अधिकार देण्याच्या उद्देशाने बिहार सरकारने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार साथीचा रोग कोविड-19 नियमावली 2020 तयार केली आहे. तसेच ही नियमावली तातडीने अंमलात आणण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागील दिवसांच्या नोंदीवरून असे दिसून आले आहे की, संबंधीत व्यक्तीने 29 फेब्रुवारी नंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या देशात जाऊन आला आहे. किंवा बाहेरच्या देशातून आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली आहेत. अशा लोकांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती जिल्ह्यातील सिव्हील सर्जन यांना देण्यात येणार आहे.

बिहार सरकारकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये कोणत्याही गावात, प्रभाग, शहर किंवा कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी त्या परिसरातील शाळा, कार्यालये बंद करु शकतात आणि जमावबंदीचा कायदा लागू करु शकतात. तसेच या भागातून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करून शकतात. तसेच या परिसरातील वाहनांवर बंदी घालू शकतात. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले जाऊ शकते.

बिहारमध्ये कोरोना व्हायरसबाबत इलेक्ट्रॉनिक, प्रिंट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या माध्यमातून कोरोना संदर्भात कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद या नव्या नियमावलीत करण्यात आली आहे.

बिहारमध्ये आतापर्यंत 69 कोरोना संशयितांचा शोध घेण्यात आला आहे. मात्र राज्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. बिहार आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार 2 जानेवारीपासून कोरोना बाधित देशातून परतलेल्या एकूण 311 प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये 105 लोकांना 14 दिवस निगराणीत ठेवण्यात आले होते. त्यांची मुदत संपली आहे. याव्यतिरिक्त बिहार सरकारकडून गया आणि पाटणा विमानतळावर आतापर्यंत 19 हजार 529 प्रवाशांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे.