खळबळजनक ! ‘कोरोना’ रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या, पुणे जिल्हयातील घटना

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  राजगुरुनगरमध्ये एका कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकाने आपल्या हाताची नस कापून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर (वय-60) असे आत्महत्या केलेल्या कोरोना बाधित रुग्णाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरातील बाजारपेठ परिसरात जुन्नरकर रहात होते. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे दोघांनाही पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 15 दिवस उपचार करून ते चार दिवसांपूर्वीच घरी परतले होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यावर आणि कोरोना टेस्ट निगटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले होते.

दरम्यान, त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्रास होत असल्याने घरी कोणतेही डॉक्टर येण्यास तयार नव्हते. त्रास कमी होत नसल्याने जुन्नरकर यांनी शुक्रवारी रात्री झोपल्यावर धारदार सुरीने हाताची नस कापून घेत आत्महत्या केली. मुलगा सकाळी उठवण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.