आहो एसपी साहेब, मदत मागता-मागता माझा जीव जातोय; ‘त्या’ कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू, ऑडिओ क्लिप व्हायरल

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – एसपी साहेब… पोलीस दल आणि रूग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता माझा जीव जात आहे. माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत. माझ्याकडे एक रूपया देखील नाही. त्यामुळे मी छतावरून उडी मारून जीव देत आहे, अशी धमकी देणारी पोलीस कर्मचा-याची ऑडीओ क्लीप 2 दिवसापूर्वी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान उपचारासाठी मदत मागणा-या त्या पोलीस कर्मचा-याचा अखेर गुरुवारी (दि. 29) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सचिन पांडूरंग इंगोले (वय 35 रा. गणेशपूर ता.जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. इंगोले हे 2018 पासून गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत इंगोले यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारासाठी 25 एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल केेले होते. त्याठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने तब्येत खालावत होती. त्यांच्या आई-वडीलांवरही उपचार सुरू होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. एसपी साहेब… पोलीस दल व रूग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता माझा जीव जात आहे. माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत. मी अनेकांना संपर्क केला. माझ्याकडे एक रूपया देखील नाही. तुम्ही सर्वजण फक्त येतो म्हणत आहात. मात्र कुणीही येत नाही. मला श्वसनाचा खूप त्रास होत असून माझे वडील देखील रुग्णालयात आहेत. साहेब, मी रूग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे, अशी ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलीस आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे होत उपचारासाठी सरसावले होते. मात्र 29 एप्रिल रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.