Corona Vaccine : देशात सर्वांनाच दिली जाणार नाही ‘कोरोना’ लस, सरकारनं दिली ‘ही’ महिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  वॅक्सीन बनवण्यात 8 ते 10 वर्ष लागू शकतात. सर्वात लवकर वॅक्सीन सुद्धा 4 वर्षात तयार होते. परंतु, कोरोना महामारीची स्थिती पाहता आम्ही ती कमी वेळात बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही 16 ते 18 महिन्याच्या आत ही वॅक्सीन तयार करत आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी दिली.

राजेश भूषण यांनी हे सुद्धा म्हटले की, संपूर्ण देशाच्या लसीकरणाबाबत सरकार कधीही वक्तव्य केलेले नाही. सायन्सशी संबंधीत विषयावर जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा अगोदर शास्त्रीय ज्ञान मिळवले पाहिजे आणि त्यानंतर विश्लेषण केले पाहिजे.

या राज्यांमध्ये वाढत आहे कोरोना

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पंजाब, राजस्थान आणि हरियाणात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाने लोकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी मास्क जरूर वापरा, सोबतच अंतर राखण्याकडे लक्ष ठेवा.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, नोव्हेंबरमध्ये कोविड -19 संसर्गानंतर बरे होण्याचे प्रमाण सरासरी प्रकरणांपेक्षा जास्त होती. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले, सरासरी 43,152 कोविड -19 प्रकरणे होती जी नोव्हेंबर दररोज नोंदली गेली होती. याच्या तुलनेत, रोज बरे होणार्‍यांची संख्या 47,159 होती.

त्यांनी म्हटले की, भारतात आतापर्यंत 14 कोटीपेक्षा जास्त कोविड -19 टेस्ट करण्यात आल्या आहेत आणि राष्ट्रीय सकारात्मकता दर 6.69 टक्के आहे. राजेश भूषण यांनी म्हटले की, देशात 11 नोव्हेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 7.15% होता आणि 1 डिसेंबरला तो 6.69% झाला आहे.

त्यांनी म्हटले की, आज सुद्धा जगातील मोठ्या देशांमध्ये भारतात प्रति दहा लाख लोकांमागे प्रकरणे सर्वात कमी आहेत. अनेक असे देश आहेत, जिथे भारतापेक्षा प्रति दहा लाख लोकांवर आठपट जास्त प्रकरणे आहेत. भारतातील मृत्यूदर प्रति मिलियन जगात सर्वात कमी आहे.