Corona Virus : ‘करोना’चा भारतातील औषध निर्मितीला ‘विळखा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोना व्हायरसमुळे जगभरामध्ये दहशत माजवली आहे. करोनामुळे अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम होत आहे. जगातील इतर देशांच्या बाजारपेठांवर, व्यवसायांवर याचा परिणाम होत आहे. भारतावरही करोनाचा परिणाम होताना दिसून येत आहे. करोनामुळे भारतात औषध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात फक्त एप्रिल महिन्यापर्यंतच पुरेल एवढाच औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या वुहान प्रांतात औषधांशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. याच प्रांतात करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वुहान येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. वुहानमधील कंपन्यांमधून कच्चा मालाच्या रुपात औषधे तयार केली जातात आणि जगभरातील विविध ठिकाणी पाठवली जातात. भारतातही औषधांसाठीचा 80 टक्के कच्चा माल हा चीनमधूनच आयात होतो. चीनमधून जवळपास 57 प्रकारचे मॉलेक्युल्स आयात होता. एवढेच नाही तर चीनमधून शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी 90 टक्के उपकरणे आणि साहित्य आयात करण्यात येते.

करोनामुळे चीन आणि विशेषत: वुहानमधील औषध कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम थेट भारतीय औषध साठ्यावर झाला आहे. भारातील औषधांच्या किंमती वाढू नये यासाठी केंद्र सरकारने एक समिती गठन केली आहे. येत्या एक महिन्यात चीनमधून औषधांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल न आल्यास देशात गंभीर वैद्यकीय परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.