‘या’ कारणामुळं पहिल्यांदाच काँग्रेसचा मोदी सरकारच्या हातात ‘हात’, केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना जे कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी असतील, त्यामध्ये भाजपासोबत उभे आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ता अजय माकन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले. ते म्हणाले, कोरोना विषाणुला तोंड देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे काँग्रेस स्वागत करत आहे आणि यामध्ये संपूर्ण सहकार्य देण्याचे वचन देत आहे.

माकन म्हणाले, सरकारने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आत्ताच केली पाहिजे. सरकारने देशात जास्तीत जास्त आयसीयू बनवले पाहिजेत, ज्यामुळे चांगले उपचार करता येतील. सरकारला लॉकडाऊनला तोंड देण्याची तयारीसुद्धा केली पाहिजे. तसेच गोरगरीब आणि झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या लोकांसाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे. काँग्रेस पक्षाकडून आम्ही सांगत आहोत की, काँग्रेस पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना, जे या महामारीशी लढण्यासाठी करण्यात येतील, त्यामध्ये पूर्णपणे सोबत आहेत.

ते म्हणाले, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश देताना म्हटले होते की, हे एका विषाणुच्या विरूद्ध मानव जातीचे युद्ध आहे. तर या युद्धात काँग्रेस पक्ष विरोधीपक्ष म्हणून सरकार सोबत खांद्याला खांदा लावून, या युद्धात लढण्यासाठी उतरणार आहे. ही महामारी रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, प्रचार आणि प्रसारासाठी पूर्ण सहकार्य करतील. मी सर्वांना आठवण करून देतो की, 12 फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी या महामारीबाबत सरकारला सावध केले होते की, सरकारने कोरोना महामारी विरूद्ध बचावासाठी आतापासून तयारी करावी, असे त्यांनी म्हटले होते.

याशिवाय 6 मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते आणि यात त्यांनी लिहिले होते की, आपण सर्वांनी आणि राज्य सरकारने सुद्धा याची तयारी केली पाहिजे. जेथे-जेथे आमचे सरकार आहे तेथे आमचे लोक सावध होते. माकन म्हणाले, आज आम्हाला काही गोष्टी केंद्र सरकारला सुचवायच्या आहेत, आणि या सूचना काँग्रेस पक्ष आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर करत आहे, टीका म्हणून नव्हे.

ते म्हणाले, आम्हाला सरकारकडून काही अपेक्षा आहेत त्या म्हणजे, आपल्याला तपासणीच्या सर्व सुविधांची तयारी केली पाहिजे. विशेष करून दूरच्या आणि दुर्गम भागासह ग्रामीण भागात ही सुविधा दिली पाहिजे. कारण येथून सुद्धा पॉझिटीव्ह रिपोर्ट येत आहेत. त्यांच्यासाठी तपासणीच्या सुविधा आणखी वाढवाव्यात. पंतप्रधानांचे म्हणणे आहे की, ही महामारी विक्राळ रूप धारण करू शकते, यासाठी आम्ही सरकारला विनंती करत आहोत की, लोकांना वेगवेगळे ठेवण्यासाठी जागेची व्यवस्था करण्यात यावी, लोकांना चांगल्यापद्धतीने क्वारंटाईन करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आयसीयुच्या बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. कारण, अद्याप आयसीयुच्या बेडची संख्या वाढवण्याबाबत कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. यात आणखी महत्वाचे हे आहे की आकडे लपवले जाऊ नयेत.