व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित मातेने दिला सुदृढ अन् निरोगी बाळाला जन्म, दोघेही सुखरुप

सुरतः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाने अवघे जग धास्तावले असतांना गुजरातच्या सुरत शहरातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना संक्रमित मातेने सुदृढ आणि निरोगी बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित बाळाची कोरोना चाचणी केली. यावेळी बाळाची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर नातेवाईकासोबत डॉक्टरांनाही आनंदाचा पारावर उरला नाही. खरंतर कोरोनामुळे अनेकांचे जीव जात असताना व्हेटिंलेटरवर असणाऱ्या महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिल्याने हा एक चमत्कारच मानला जात आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना हा आजार अगदी नवजात बाळापासून 100 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच घातक ठरत आहे. तर दुसरीकडे कोरोनाने गरोदर महिलांनाही आपल्या कवेत घेतले आहे. गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्यास अनेक गुंतागुंतीच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा भयंकर परिस्थितीत सुरत येथील एक गरोदर महिला कोरोनाबाधित असल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत होती. दरम्यान तिला अचानक प्रसूती कळा सुरु झाल्या. त्यामुळे त्या महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. पण संबंधित महिलेन व्हेटिंलेटरवर असतानाही एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित बाळाची कोरोना चाचणी केली. यावेळी बाळाची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या कोरोना बाधित आईवर रुग्णालयातच उपचार सुरु असून बाळाची प्रकृती ठणठणीत आहे.