Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं IPL च्या वेळापत्रकात होऊ शकतो ‘बदल’, आरोग्य मंत्र्यांनी दिले ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) वर कोरोना विषाणूचा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएलचे वेळापत्रक बदलू शकते असे संकेत देखील दिले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी जमू शकते आणि ती गर्दी रोखण्यासाठी सरकार आयपीएल पुढे ढकलण्याचा विचार करीत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की लोकांचे जीवन आयपीएल खेळण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी विषाणू पसरण्याचा मोठा धोका असतो. यामुळे आयपीएल लांबणीवर पडू शकेल अशी चर्चा चालू आहे.

यापूर्वी बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली होती की, आयपीएल २०२० खेळले जाईल आणि कोरोना विषाणूसंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गेल्या शुक्रवारी हे स्पष्ट केले होते की, आयपीएलचे सामने खेळले जातील. २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी मंडळ तयार आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या ४१ रुग्णांची पुष्टी झालेली आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा धोका पाहता या संबंधी सर्व भागधारक, खेळाडू, फ्रँचायझी, एअरलाईन्स, टीम हॉटेल्स, ब्रॉडकास्टिंग क्रू आणि या लीगमध्ये सहभागी सर्वांना सावधानी आणि सुरक्षितता पाळण्यासाठी सरकारच्या सूचनांचे पालन करण्यासाठी सांगितले जाईल.

बोर्डाने असेही म्हटले आहे की, खेळाडूंना सांगण्यात येईल की चाहत्यांशी हातमिळवणी करू नये. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे ३,३०० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्याच्या वाढत्या धोक्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे.