Coronavirus : नागरिकांनी सहकार्य करायला हवं, त्याशिवाय ‘कोरोना’वर मात करणं अशक्य : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे अशक्य आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून यावर मात करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन झिरो पुणे’ या उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनवडे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रदीप देशमुख व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ची चांगली बाब आहे. अशावेळी कोरोनाच्या लढ्यात सामान्य नागरिकांनी देखील साथ दिली पाहिजे.

‘मिशन झिरो पुणे’ची माहिती देताना शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व मालेगाव येथे मिशन झिरो राबवण्यात आले आहे. पुणे शहरामध्ये फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे तीन ते पाच हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. तसेच नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी असलेली भीती कमी करुन या महामारी विषयी जनजगृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.