सर्वप्रथम ‘करोना’चा धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा ‘करोना’मुळे मृत्यू

पेईचिंग : वृत्तसंस्था – करोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून या जिवघेण्या करोना व्हायरसचा धोका जगाला असल्याचे सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरचा करोना व्हायरसमुळेच मृत्यू झाला. ली वेनलियांग असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनेच ही माहिती दिली असून 34 वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारख्या भयानक विषाणू चिनमध्ये आला असल्याचे सांगत हा विषाणू जीवघेणा असल्याचे सांगितले होते. जगाला या विषाणूपासून सावध करणाऱ्या डॉक्टरच या विषाणूचे बळी ठरले आहेत. वेनलियांग यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र, आज त्यांचा वुहान येथे मृत्यू झाला.

वुहान येथे 30 डिसेंबर 2019 मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. त्यांच्यामध्ये सार्स सारखा आजाराची लक्षण आढळली होती. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवून त्यांचे सुक्ष्म विश्लेषण करण्यात आले होते. त्यावेळी करोना व्हायरस असल्याचे त्यांना आढळून आले होते. हा व्हायरस मोठा व्हायरस असून त्याचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. वेनलियांग यांनी याची सुचना दिल्यानंतर अनेकांनी याचे स्क्रिन शॉट काढून ते व्हायरल केले होते. अफवा पसवल्याचा आरोप पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर ठेवला होता.