कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे CM ठाकरेंचा PM मोदींना फोन; केली ‘ही’ मोठी मागणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण येत आहे. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत 63,729 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर यामध्ये 398 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 8,217 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात 49 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 86 हजारांपेक्षाही जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या परिस्थितीवरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करून चर्चा केली. त्यावेळी ठाकरे यांनी महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा असून, 1200-1500 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा लवकर करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, कोरोना प्रकरणांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यावरून आता महाराष्ट्र स्टेट कोविड टास्क फोर्सचे चेअरपर्सन डॉ. संजय ओक यांनी विधान केले आहे. रुग्णालयात अनावश्यक शस्त्रक्रिया टाळली तर त्या माध्यमातून ऑक्सिजनची बचत करता येऊ शकते. मात्र, हा निर्णय रुग्णाच्या आरोग्याची स्थिती काय आहे, त्यावरूनच घेतला जावा, असेही त्यांनी सूचवले.