Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह केसेस का वाढल्या ? MCGM ने सांगितली ‘ही’ 4 प्रमुख कारणं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –  देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कशामुळे वाढत आहेत ? याची बृहन्मुंबई महानगरपालिकेने (MCGM) प्रमुख चार कारणं सांगितली आहेत. दरम्यान मुंबईत बुधवारी सायंकाळपर्यंत 714 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली होती. तर 59 लोक बरे झाली आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

MCGM ने दिलेली प्रमुख चार कारणं

1. नागरिकांच्या चाचणीचे प्रमाण

एमसीजीएमच्या म्हणण्यानुसार वाढत्या चाचणीच्या क्षमतेमुळे महानगरात पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. मनपा प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांना मुंबईत परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारी प्रयोगशाळांची देखील क्षमता वाढवण्यात आली आहे.

2. ट्रेसिंगवर भर

मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याचे दुसरे कारण म्हणजे महानगरपालिकेने कॉन्टेक्ट ट्रेसिंग सुरु केले आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आलेली नाहीत त्यांची चाचणी घेण्यासाठी विशेष क्लिनिकची सुविधा करण्यात आली आहे. असे केल्याने वरळी, कोळीवाडा आणि धारावीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या क्लस्टर्समध्ये मदत झाली आहे. या ठिकाणी समुदाय संक्रमणाचा धोका अधिक आहे.

3. वरळी, कोळीवाड्यात अधिक प्रकरणे

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे तिसरे कारण आहे वरळी कोळीवाडामध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर आली आहेत. 40 हजार लोकसंख्या असलेल्या या भागात 51 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. एवढेच नाही तर जी साऊथ वॉर्डमध्ये ही संख्या 135 झाली आहे. चेंबूरमधील सरकारी कार्यालयात एका कुकपासून संसर्ग होण्यास सुरुवात झाली आणि तो संपूर्ण परिसरात पसरला. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे, त्यापैकी 364 जणांची चाचणी करण्यात येणार आहे.

4. वोकार्ट हॉस्पिटलमधील 52 पॉझिटिव्ह प्रकरणे

मुंबई सेंट्रलमध्ये असलेल्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये 52 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने हॉस्पीटलचा संपूर्ण स्टाफ संक्रमीत झाला. त्यामुळे एमसीजीएमने रुग्णालयाला कॉरंटाईन झोन घोषित केले आहे.

एमसीजीएमच्या मते, मुंबई हे एक मोठे लोकसंख्या असलेले शहर आहे आणि येथे प्रकरणाची संख्या वाढू शकते. परंतु परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. बुधवारी नोंदविण्यात आलेल्या 106 प्रकरणांपैकी 51 जी साऊथ वॉर्डमधील आहेत. या रूग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.