‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत ६ हजारहून अधिक जणांचा जीव घेतला आहे. राज्यातही हा आकडा ३९ वर पोहोचला आहे. दरम्यान राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. यासाठी राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये दक्षता घेण्यात येणार असून रास्तभाव दुकानात शिधा वस्तुंचे वितरण करतांना लाभार्थ्याचे बायोमॅट्रीक पडताळणी न करता स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचे आधार प्रमाणित करून धान्य वाटप करण्याचे आदेश आज अन्न नागरी पुरवठा विभागाचे दिले आहेत.

राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले होते की, स्वस्त धान्य दुकानदारांना या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून ई-पॉझ मशीन तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात यावा. आता या निवेदनाची दखल शासनाची घेतली असून अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्र. संकीर्ण – २०२० / प्र. क्र. ५६ / सं. क. मंत्रालय मुंबई यांचे १७ मार्च २०२० अन्वये शासनाचे सहसचिव स. सुपे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार दुकानातून धान्य वितरण करतांना लाभार्थ्याची बायोमॅट्रीक पडताळणी न करता दुकानदारांनी स्वत:चे आधार प्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा आजपासून सुरू करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांचा ई – पॉझ मशीनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल.

ई-पॉझ उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही – छगन भुजबळ

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही खबरदारी घेतली हे आहे. रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ पुढे म्हणाले कि, संसर्ग टाळण्यासाठी रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षतादेखील घेण्यात यावी. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेऊन रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी.

यासोबतच कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरीत करताना संबंधितांनी साबणाने, सॅनिटाईझरने हात स्वच्छ करुन ई-पॉझ उपकरणे हाताळण्याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार, अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. दरम्यान, वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहील. ही सुविधा ३१ मार्च, २०२० पर्यंतच लागू राहील, असेही छगन भूजबळ यांनी यावेळी सांगितले.