जर लॉकडाऊन पूर्णपणे हटवला तर वर्षाअखेर देशातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक होतील ‘कोरोना’ संक्रमित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते. २५ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. मागच्या वेळी दिलेल्या सवलतींचा विचार करता ३१ मेनंतर लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोविड-१९ ची प्रकरणे झपाट्याने वाढतील आणि वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील निम्मी लोकसंख्या कोरोना संक्रमित होईल, असे ज्येष्ठ विषाणू वैज्ञानिक डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले.

३० जानेवारी रोजी भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर ही महामारी रोखण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. कोरोना संसर्गाची चाचणी घेण्याची क्षमता वाढवली आणि महामारीला रोखण्यासाठी, लोकांची गर्दी रोखण्यासाठी एक अब्जहून अधिक लोकांना आपापल्या घरात राहण्यास सांगितले. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने ये-जा करणाऱ्या सेवा निलंबित करण्यात आल्या, परंतु आता हळूहळू सगळ्या गोष्टी रुळावर परत येत आहेत, जर काही ठीक होत नसेल तर ते कोरोना विषाणूचा प्रसार आणि परिणाम आहे.

लॉकडाऊनमुळे कमी होते संक्रमणाचे प्रमाण

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायसेन्स (निम्हंस) चे न्यूरोव्हायरोलॉजीचे प्रमुख व्ही. रवि यांच्या म्हणण्यानुसार, केवळ लॉकडाऊनमुळेच देशात संक्रमणाची गती कमी झाली होती, पण येणारे दिवस यापेक्षाही वाईट असू शकतात. डॉ. रवी म्हणाले की, आता आपल्याला कोरोना विषाणूसह जगायला शिकावे लागेल. ते म्हणाले की, गैर-कोविड-१९ संबंधित कारणामुळे अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ते म्हणाले की, एच१एन१ च्या मृत्यूचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक होते, पण लॉकडाऊनची गरज पडली नाही. कारण काही वर्षांपूर्वी अशी दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया नव्हता.

कर्नाटक इतर राज्यांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे

रवी कर्नाटकमधील कोविड-१९ तज्ञ समितीचे प्रमुखही आहेत. ते म्हणाले की, कर्नाटकने कोरोना विषाणूचा सामना करण्याचे काम इतर राज्यांपेक्षा चांगले केले आहे. राज्य सरकारने कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी क्वारंटाइन होणे बंधनकारक केल्यामुळे सध्या राज्यभरात क्वारंटाइन केंद्रामध्ये किमान १.१ लाख लोक नोंदणीकृत आहेत. कर्नाटक सरकारने केंद्राला महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून येणार्‍या विमानांची संख्या कमी करण्याची देखील मागणी केली आहे. या पाच राज्यात मोठ्या प्रमाणात संक्रमित आढळत असल्याचे सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातहून रस्त्याने कर्नाटकात येण्याची बंदी कायम आहे.

आशियातील सर्वाधिक रुग्ण भारतात

कोरोना विषाणूची सुरुवात चीनमधून झाली असली, तरी आता संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत. शिथिलता दिलेल्या लॉकडाऊन ४.० च्या १० दिवसांत ६० हजार रुग्ण आढळले, त्यामध्ये ३१,७२० बरे देखील झाले. २८ मे रोजी सर्वाधिक ७ हजार १३५ नवीन रुग्ण आढळले. अशाप्रकारे कोरोना महामारीचे सर्वात जास्त रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.