Coronavirus : धारावी, कोळीवाडा नाही तर ‘हा’ आहे मुंबईतील ‘कोरोना’चा नवा ‘हॉटस्पॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण मुंबईत सापडले आहेत. सुरुवातीला मुंबईमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी आणि वरळी परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश आलं आहे. मात्र, आता मुंबईतील इतर भागात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत आता नवे हॉटस्पॉट समोर येऊ लागले आहेत.
अंधेरी पश्चिम प्रभागामध्ये 4 हजार पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम मिळून 8894 इतके रुग्ण आढळून आले आहेत. सध्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण अंधेरी या उपनगरात आहेत. तर रुग्णांच्या संख्येत सगळ्यात आधी अंधेरी पूर्व, जी उत्तर आणि मग अंधेरी पश्चिम असा क्रमांक लागतो.

दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणाचा संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या चौफेर प्रयत्नांना आता यश येताना दिसून येत आहे. उपाय योजनांमध्ये कोणतीही कसर न ठेवता आणखी आक्रमकरित्या उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने नुकतेच मिशन युनिव्हर्सल टेस्टींग हाती घतले आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अर्ध्या तासात कोरोना चाचणी अहवाल देण्यात येणार आहे. यासाठी अँटीजेन टेस्टिंगचे एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच शासनाने नुकत्यात दिलेल्या मान्यत्येनुसार रॅपिड टेस्टिंग कीट खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्या यांनाही सुचवण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत विविध अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहायक उपायुक्त तसेच विविध वैद्यकीय प्रयोगशाळांचे मुख्य कार्यकारी यांची 23 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त चहल यांनी विविध निर्देश दिले आहेत.