क्वारंटाइनमधून फक्त 8 सेकंदासाठी खोलीबाहेर आला, 2.5 लाख रुपयांचा दंड

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अनेक देशांत हाहाकार मजला आहे अमेरिका, फ्रान्स, इटली, चीन ,भारत यांसारख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यात तैवानला यश आल्याचा म्हटलं जातं. चीनचा शेजारी देश असूनही तैवानमधील कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. मात्र, तैवानमधील कोरोना नियम अत्यंत कठोर आहेत. कारण एका व्यक्तीला ८ सेकंदाच्या चुकीसाठी अडीच लाख रुपये दंड आकारण्यात आला. मूळचे फिलिपिन्समधील असलेल्या एका व्यक्तीला तैवानमधील गौशंग शहरातील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

तैवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, क्वारंटाइनमध्ये असतानाही व्यक्ती काही सेकंदासाठी खोलीतून बाहेर निघाली आणि हॉलमध्ये गेली असा आरोग्य विभागानं म्हटलं आहे. ही व्यक्ती खोलीबाहेर येऊन काही सेकंद हॉलमध्ये येण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाला घटनेची माहिती दिली. आरोग्य विभागाने त्या व्यक्तीला सुमारे अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला.

गौशंग शहरात ५९ क्वारंटाइन हॉटेल आहे. त्यामध्ये तीन हजार खोल्या क्वारंटाइन ठेवण्यात आले आहेत.तैवान मधील क्वारंटाइन नियमानुसार लोकांना खोलीत कितीही दिवस राहावे लागेल तरीसुद्धा त्यांना त्यांच्या खोल्या सोडण्याची परवानगी नाही . जवळपास दोन कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये आत्तापर्यंत फक्त ७१६ कोरोना रुग्ण आढळले आहेत तर कोरोनाने सात लोकांचा बळी घेतला आहे. तैवानने इतर देशांप्रमाणे लाॅकडाऊन केले नाही आणि देशातील सामान्य लोकांच्या हालचालींवर निर्बंध घातले नाहीत.