सावधान ! पुण्यात डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते ‘कोरोना’ची दुसरी लाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतात आतापर्यंत १ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला असून पुणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यानंतर आता पुण्यासाठी नवीन धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रशासनाच्या वतीने पुण्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हि पुण्यासाठी नवीन धोक्याची घंटा मानली जात आहे.या शिष्टमंडळाने पुणे महापालिकेने त्यादृष्टीने तयारी निर्देश देखील दिले आहेत.

या शिष्टमंडळाने पालिकेने केलेल्या नियोजनाचे निरीक्षण देखील केलं. यामध्ये पालिकेने उभे केलेले ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, रुग्णालयातील सुधारणा, खाटांचे नियोजन आणि कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होण्यासंदर्भात राबविलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींबाबत या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केलं आहे. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. पण आता दोन हजारांहून या रुग्णांची संख्या ७०० वर आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारने दिलेल्या मानकांप्रमाणे पुणे महापालिका काम करत असल्याचं निरीक्षण देखील त्यांनी नोंदवलं आहे.

डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी गेल्या चार दिवसात पुण्यातील विविध कोविड सेंटरमध्ये भेट दिली. यामध्ये त्यांनी विविध उपाययोजनांविषयी माहिती घेत निरीक्षण आणि अभ्यास केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी काही महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. यामध्ये त्यांनी तपासण्या वाढवण्याचे निर्देश देखील दिले आहेत. पुण्यातील जम्बो रुग्णालय आणि अन्य कोविड सेंटरमध्ये तसेच खाजगी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधत रुग्णवाढीचा दर आणि मृत्युदर कमी करण्याचे निर्देश देखील महापालिकेला दिले आहेत.